Gutkha seizure 
नांदेड

Gutkha seizure nanded : प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; नायगाव पोलिसांची कारवाई

अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला १ लाख २४ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल नायगाव पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी रातोळी (ता. नायगाव) येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रातोळी येथील निळकंठ भुजंगराव पाटील यांच्या राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांच्या पथकाने शासकीय वाहनाने रातोळी येथे जाऊन दोन शासकीय पंचांच्या समक्ष घराची झडती घेतली. यावेळी सागर पान मसाला ३२८ पाकिटे (किंमत ४५ हजार ९२० रुपये), एसआर-१ सुगंधित तंबाखू ३२८ पाकिटे (४५ हजार ९२० रुपये), केसयुक्त विमल पान मसाला १९० पाकिटे (१९ हजार ९५० रुपये), वि-१ तंबाखू १९० पाकिटे (८ हजार ५५० रुपये), मुसाफिर पान मसाला ३० पाकिटे (३ हजार ६०० रुपये) आणि एम-४ रॉयल जाफराबादी जर्दा ३० पाकिटे (९०० रुपये) असा एकूण १ लाख २४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी आरोपी निळकंठ भुजंगराव पाटील (वय ६०, रा. रातोळी, ता. नायगाव) याच्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८९/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम ५९(१)(२) व नियम २०११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर, पोलिस निरीक्षक अमोल भगत व त्यांच्या पथकाने केली. प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT