

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणारी टोयोटा इनोव्हा गाडी पकडून पोलिसांनी वाहनासह एकूण १३ लाख ९९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, अर्सजन मार्गे लातूर फाट्याकडे एका इनोव्हा गाडीतून (MH-12-RR-4536) गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित गाडी अडवून तपासणी केली. त्यावेळी गाडीत विमल गुटखा, व्ही-१ जर्दा व इतर पानमसाला असा सुमारे ३.९९ लाखांचा साठा आणि १० लाख रुपयांची इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली.
या प्रकरणी शेख फाजील, शेख तौफीक आणि शेख अनिस (सर्व रा. पूर्णा, जि. परभणी) यांना ताब्यात घेतले आहे. हा माल कर्नाटकातील कलबुर्गी येथून शेख अफताफ याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.