Nanded News : Attack on the former deputy chief minister of Punjab out of anger at the insult of 'Sri Guru Granth Sahib'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शीख धर्मामध्ये गुरुस्थानी असलेल्या 'श्री गुरू ग्रंथ साहिब' च्या पंजाबमध्ये मागील काळात झालेल्या अवमानास बादल परिवार तसेच त्यांचा पक्ष जबाबदार असल्याच्या रागातूनच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर आपण नांदेडमध्ये हल्ला केला, अशी खळबळजनक कबुली आरोपी जसपालसिंग याने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गेल्या गुरुवारी नांदेडमधील माता साहिब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेनंतर हल्लेखोर जसपालसिंग यास तत्काळ ताब्यात घेऊन मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या व्हीआयपी (VIP) व्यक्तीवरील हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष सुरक्षा पथकाचे महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी नांदेडमध्ये येऊन चौकशी केली. तसेच नांदेड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आरोपीची सखोल चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारात आलेली व्यक्ती पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल असल्याचे समजताच जसपालसिंग अस्वस्थ झाला.
पंजाबमधील श्री गुरू ग्रंथ साहिबचा अवमान तसेच तिथे फोफावलेल्या अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला हीच व्यक्ती जबाबदार असल्याची जाणीव त्याला झाली आणि आपण त्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेतला. बादल पायऱ्या उतरून खाली येताच गर्दी कमी झाल्याची संधी साधून आपण कृपाणने हल्ला केला, असे जसपालसिंगने स्पष्ट केले. या हल्ल्यामागे पंजाबमधील इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचा सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेले नाही.
अखंड सेवेतून प्रेरणा; आजारी असूनही बजावली सेवा
पोलिसांच्या चौकशीतून एक विशेष बाब समोर आली आहे. माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार घटनेच्या १५ दिवस आधी पंजाब दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत जसपालसिंग याने आजारी असूनही गुरुद्वारातील दैनंदिन सेवा अत्यंत भक्तिभावाने तसेच निष्ठेने पार पाडली होती. या अखंड सेवेमुळेच अकाल पुरख (परमेश्वर) कडून आपल्याला बादल यांना शिक्षा करण्याचा हा आदेश मिळाला, असा दावा जसपालसिंगने केला आहे.