Nanded News: Ashok Chavan takes the initiative for Vajpayee's statue!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्ताकाळात नांदेडमध्ये या पक्षाच्या एकाही माजी पंतप्रधानांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला नाही; पण याच पक्षाचे आता भाजपात असलेले माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून भाजपाचे संस्थापक व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वांच्या पुतळ्याच्या उभारणीस नांदेड मनपाने अग्रक्रम दिला आहे.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी नांदेड-वाघाळा मनपामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच सभेमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यासंदर्भातील ठराव पारित झाला होता. पुतळ्यासाठी नवीन कौठा भागात निश्चित करण्यात आलेली जागा मनपाकडे अद्याप हस्तांतरित झाली नसली, तरी वाजपेयींचा पूर्णाकृती पुतळा येत्या २५ डिसेंबरपूर्वी उभारण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांतील राम सुतार आटर्सची निविदा नुकतीच स्वीकारण्यात आली. ४० लाखांहून अधिक रक्कम पुतळ्यासाठी खर्च केली जाणार आहे. पुतला परिसरातील स्थापत्य कामांची निविदाही स्वतंत्रपणे जारी झाली आहे.
भूतपूर्व राजकीय नेत्यांपैकी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल या दोन राजकीय नेत्यांचे अर्धाकृती पुतळे तत्कालीन नगर परिषदेतील काँग्रेसच्या सत्ता काळात नांदेडमध्ये स्थापित झाले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नेहरू-गांधी परिवारातील एकाही माजी पंतप्रधानांचा पुतळा नांदेडमध्ये उभारला नाही; पण माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या शिक्षणसंस्थेच्या परिसरात शासनाच्या निधीतून पुजारी उभारला गेला.
विशेष सरदार पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील मोठे योगदान तसेच आजच्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली धड़क कारवाई याची नोंद घेऊन त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी वेळोवेळी झाली; पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या समूहांना खूश करण्यासाठी महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे भव्य पुतळे उभारले गेले. त्यानंतर आता शहरातल्या पुतळ्यांमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची भर पडत आहे. दुसऱ्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उभारणीचे कामही सुरू झाले आहे.
नांदेड-वाघाळा मनपाच्या मागील निवडणुकीत भाजपाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, भारतरत्न नानाजी देशमुख व अटल बिहारी वाजपेयी यांचे पुतळे उभारण्याचा मनोदय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात व्यक्त केला होता. त्यानुसार वाजपेयी यांच्या पुतळ्यास अग्रक्रम देण्यात खा. चव्हाण यांनी घेतलेला पुढाकार राजकीयदृष्ट्वा अर्थपूर्ण समजला जात आहे.