नांदेड : नांदेडला कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय भाजप महायुती राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खा. अशोक चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीत कर्करोगासाठी महाराष्ट्रात त्रिस्तरीय समग्र उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे त्यामध्ये नांदेडचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार नांदेडसह राज्यातील ९ शहरांमध्ये 'एल-२' वर्गाची उपचार सुविधा असलेली रुग्णालये उभारली जाणार आहेत.
नांदेडमध्ये प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाचा अंदाजित खर्च २०९ कोटी रुपये असून, या रुग्णालयात १०० खाटांचा आंतररुग्ण विभाग व ५० खाटांचा दैनंदिन उपचार विभाग असणार आहे. येथे सर्जिकल ऑन्कोलॉजी (कॅन्सर शस्त्रक्रिया), कीमोथेरपी व रेडिएशन थेरपी उपचार उपलब्ध असतील. तसेच, स्पेशलिस्ट डॉक्टर्स (ऑन्कोलॉजिस्ट्स) देखील नियुक्त केले जाणार आहेत.
खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक उन्नत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या असून, दोन्ही स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. नांदेडला उभारण्यात येणारी कर्करोग विशेषोपचार सुविधा देखील त्याच पाठपुराव्याचे फलित आहे.या निर्णयाबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.