Nanded News : बाभळीतून वाहून गेले २० हजार दलघमी पाणी  File Photo
नांदेड

Nanded News : बाभळीतून वाहून गेले २० हजार दलघमी पाणी

मराठवाड्यातील सर्व जलाशयांतून अजूनही विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: 20 thousand million cubic meters of water flowed from Babhli

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : यावर्षी परतीचा पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक जोरदार बरसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही पावसाची अपेक्षा आहे; पण, पावसाळ्याच्या मध्यातच राज्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. ऑक्टोबर उजाडला तरी सर्व धरणातून विसर्ग सुरूच आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचा जलाशय असलेल्या बाभळी (ता. धर्माबाद) बंधाऱ्यातून या पावसाळ्यात १९ हजार ५१२ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्येसुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे, परंतु लोक मात्र आता पावसाला पुरते वैतागले आहेत. शनिवारी (दि. २७) पासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सोमवारी (दि. २९) लख्ख ऊन पडले. बुधवारपर्यंत (दि. १ ऑक्टोबर) असेच चित्र होते. शिवाय या तीन दिवसांत जिल्ह्यात कुठेही पाऊस पडला नाही. बुधवारीसुद्धा ऊन पडले; परंतु उकाडा कायम आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मावळलेली नाही, अशी अनाहूत भीती व्यक्त होत आहे. दररोज आकाश मोकळे आहे; परंतु निरभ्र नाही. दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार होत आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात पावसाने जोर पकडला असला तरी मुंबई व पश्चिम महाराष्ट्रात जूनपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. परिणामी त्या भागातील जलाशय ओव्हरप्लो झाल्याने वाहून आलेल्या पाण्यानेच मराठवाड्यातील जायकवाडीसह बहुतेक जलाशय भरले; पण ऑगस्टअखेर माजलगाव वगळता सर्वच जलाशयांतून पाणी सोडण्याची पाळी आली. काही दिवसांनी माजलगाव धरणातूनसुद्धा विसर्ग करावा लागला. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतली नाही.

हवामान खात्याने १ व २ ऑक्टोबर रोजी पावसाचा इथारा दिला होता. काही अभ्यासकांच्या मते ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस पडणार आहे; पण, आजपर्यंतच विविध धरणांतून हजारो दलघमी पाणी वाहून गेला आहे. गोदावरी ही या विभागातील सर्वात मोठी नदी असून त्यावर मराठवाड्यात सर्वात पहिले धरण २१७० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचे जायकवाडी आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर धर्माबाद तालुक्यात बाभळी येथे केवळ ५५ (२.७५ टीएमसी) दलघमी साठवण क्षमतेचा बंधारा आहे. यावरून महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात वाद असून तो सर्वोच्च न्यायालयात आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत येथे पाणी अडवता येत नाही. दरम्यान, पावसाळा सुरू होताना बाभळीच्या पुढे तेलंगणा राज्यात श्रीरामसागर (पोचमपाड) २१७९ दलघश्रमी क्षमतेचे धरण जवळपास रिकामे होते; परंतु बाभळीतून वाहून गेलेल्या पाण्याने ते काठोकाठ भरून ओव्हरफ्लो झाले आहे.

या धरणातून आजवर १९ हजार ९४०.९४५ दलघमी पाणी पुढे सोडण्यात आले. तर बाभळी बंधाऱ्यातून १ ऑक्टोबर सकाळपर्यंत १९ हजार ५१२.१४० दलघमी पाणी वाहून गेले. तेलंगणातील धरणेसुद्धा पूर्णपणे भरलेले असल्याने परस्पर सामंजस्याने यंदा बाभळी बंधारा ऑक्टोबरनंतरसुद्धा भरलेले असेल, असा मतप्रवाह आहे.

मराठवाड्यातील सर्व जलाशयांतून अजूनही सर्व धरणांतून विसर्ग सुरूच आहे. जायकवाडीतून बुधवारी २९८.९६५ दलघमी, माजलगाव १९.४४०, येलदरी १८.०६७, सिद्धेश्वर ३०.२७३, लोअर दुधना ६.८९०, अपर मानार (लिंबोटी) ०.७३०, लोअर मानार (बारुळ) ३.९७० आणि इसापूर (जि. वाशिम) धरणातून १०.५३१ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर विष्णुपुरी प्रकल्पातून ५४३.३९० दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT