

Manur village crocodile sighting
उमरी : उमरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील मनूर शिवारात पुराच्या पाण्यात एका मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ही मगर एका निवासी आश्रमशाळेजवळ दिसून आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मनूर येथील तरुण शेतकरी तिरुपती मनूरकर रात्री शेतात गेले असता त्यांना पाण्यातून मगरीचे डोळे चमकताना दिसले. बारकाईने पाहिल्यावर मोठ्या आकाराची मगर असल्याचे लक्षात आले. धाडस करून त्यांनी मगरीचे छायाचित्र काढून गावकऱ्यांना दाखवले व सर्वांना सावध केले.
घटनेची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली. नागरिक विशेषतः शेतकरी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळत आहेत. अजूनही गोदावरी नदीचे बॅक वॉटर या भागात असल्याने मगरींसह अजगर, साप व इतर विषारी प्राणीही दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतावर जाण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून आलेल्या पुरामुळे मनूरसह परिसरातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन वाहून गेली असून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. राहेर आणि बळेगाव परिसरात बुधवारी पाणी पातळी वाढलेली दिसून आली. परिणामी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहिले.
गावकऱ्यांनी वनविभाग व महसूल विभागाकडे योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.