Naigaon Gold and Cash Stolen  Pudhari
नांदेड

Nanded Burglary | नायगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; शिवगंगा सोसायटीतील दोन घरे फोडून दागिने, रोकड लंपास

Naigaon Theft | Nanded Policeपोलिसांच्या गस्त आणि तपास यंत्रणेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Gold and Cash Stolen

नायगाव : नायगाव शहरातील शंकर नगर परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. शिवगंगा सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत दोन घरांतून दागिने आणि रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त आणि तपास यंत्रणेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंगबर वल्हे आणि नागेश्वर यादव यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. मध्यरात्री ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाली. विशेष म्हणजे, दिंगबर वल्हे यांचे कुटुंब घरातील एका खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी त्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि नंतर घरातील कपाटे फोडून चोरी केली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी दोन्ही घरांतून अंदाजे दोन ते अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.

दिंगबर वल्हे यांनी त्याच दिवशी सोयाबीन विक्री केली होती. त्या व्यवहारातील मोठी रक्कम घरात असल्याचा अंदाज चोरट्यांना होता. मात्र, संबंधित पैसे ऑनलाइन खात्यात जमा झाल्याने अंदाजे तीन ते चार लाख रुपयांची रक्कम वाचल्याचे वल्हे यांनी सांगितले.

सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी पहाटे साडेचारच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले.

दरम्यान, आयपीएस अधिकारी शशांक सर, पोलीस उपनिरीक्षक तोटावार तसेच बीट जमादार साई सांगवीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती

नायगाव शहरात गेल्या काही दिवसांत चोरी, घरफोडी, मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त अपुरी पडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

पूर्वीच्या गुन्ह्यांचाही तपास रखडला

शहरात यापूर्वी घडलेल्या अनेक घरफोड्या, मोबाईल चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांचा अद्याप ठोस तपास लागलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.

काही नागरिकांनी आरोप केला की, काही बीट कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांकडे अधिक लक्ष देत असून गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष होत आहे. वाहन चोरीसारख्या अनेक प्रकरणांतील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने शहरात गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT