

मानवत : मानवत बायपास रोडवर शिवाई बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले पाथरी येथील शिक्षक भगवान पाथरीकर (वय 56) यांचा शुक्रवारी ता 1 नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान ब्रेन डेड झाला असून नातेवाईकांच्या परवानगीने अवयदानाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.
शहरातील संत गजानन महाराज मंदिर समोरील वळण रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाची शिवाई बस व मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात मंगळवारी ता 28 ते गंभीर जखमी झाले होते.
भगवान पाथरीकर हे पाथरी येथून जिंतूर तालुक्यातील झरी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळेत जाण्यासाठी ते पाथरीहून सकाळी निघाले होते. शहराबाहेरील संत गजानन महाराज मंदिरासमोरील वळण रस्त्यावरून मोटारसायकल वरून (क्रमांक एम एच 22 ए एच 4855 ) ते जात होते. यावेळी नांदेड ते बीड जाणारी बस ( क्रमांक एम एच 49 बी झेड 7219 ) परभणीहून मानवतला येत असतांना वळण रस्त्यावर सदरील अपघात झाला.
या अपघातात भगवान पाथरीकर यांच्यावर मानवत, परभणी व नंतर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेल्याने आज त्यांचा मेंदू मृत झाला असून नातेवाईकांच्या परवानगीनंतर अवयदानाची प्रक्रिया सुरु असल्याची माहीती मारोती साठे यांनी दिली. स्वभावाने शांत व मनमिळावू असलेल्या भगवान पाथरीकर यांच्या निधनाने पाथरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुली एमबीबीएस शिक्षित असून दोघींचे विवाह झालेले आहेत.