Bogus employee investigation Naigaon Nanded
नायगाव : नायगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अधिकृत नियुक्ती नसतानाही काही व्यक्तींकडून गेल्या सुमारे आठ वर्षांपासून कामकाज सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महसूल प्रशासनात खळबळ उडाली. या कथित ‘बोगस’ कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागात काही व्यक्ती अधिकृत कर्मचारी नसतानाही कार्यालयीन कामकाजात सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित व्यक्तींनी विविध शासकीय कामांमध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले जात असून यामुळे अधिकृत कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनन्या रेड्डी यांनी तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांना एका बैठकीच्या वेळी या गंभीर प्रकाराची माहिती दिली संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीची प्रक्रिया, कार्यालयातील कामकाज आणि त्यामागील जबाबदार घटक याची सखोल तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नायगाव तहसील कार्यालयाच्या कामकाजावर अनेक प्रकाराने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अधिकृत कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का, तसेच या प्रकारामागील जबाबदारांवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
नायगाव तहसीलमध्ये उघड झालेल्या कथित बोगस कर्मचाऱ्यांच्या प्रकरणावर सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनन्या रेड्डी यांनी घेतलेली ठोस भूमिका प्रशासनातील पारदर्शकतेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, “हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत मांडण्यात आला होता. सध्या उपलब्ध माहितीनुसार चौकशी सुरू असून अशा प्रकारचे आणखी काही प्रकरणे आढळल्यास त्यांचीही चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील गोदाम कारभाराबाबतही काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोदामाचा कारभार पाहणाऱ्या गायकवाड मॅडम या तहसील कार्यालयातील मर्जीतील गोदाम कीपर असल्याची चर्चा असून त्यांना पदभार देण्यामागील कारणांबाबतही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांबाबत नांदेड येथे एका गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांना नातेवाईक असल्याने व कमाई करून देण्यासाठी पदभार देण्यात आल्याचा आरोप होत आहे. या सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.