सोयाबीनच्या गंजींना आग लावण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे  (Pudhari Photo)
नांदेड

Nanded Soybean Fire | कोपरा येथे पुन्हा एकदा सोयाबीनच्या गंजीला आग: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कोपरा (ता. नायगाव) येथे अज्ञात व्यक्तींनी शेतातील सोयाबीनच्या गंजींना आग लावण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

Naigaon soybean haystack fire

नायगाव : कोपरा (ता. नायगाव) येथे अज्ञात व्यक्तींनी शेतातील सोयाबीनच्या गंजींना आग लावण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनांची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सोमवारी (दि.३) रात्री सुमारे ११ वाजता, गट क्रमांक ७३ मधील शेतकरी अशोक गंगाधर पवळे (गुरूजी) यांच्या शेतात ही घटना घडली. त्यांच्या चार एकर शेतीतील बेडवर कापणी झालेल्या सोयाबीनची गंजी रचण्यात आली होती. मात्र, रात्री उशिरा अज्ञातांनी या गंजीला आग लावली. ही आग काही क्षणातच विक्राळ रूप धारण करत पूर्ण गंजी राख करून गेली.

या घटनेत अंदाजे ४० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच गावात याआधी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी शेतकरी साहेबराव बालाजी पवळे यांच्या शेतातील दीड एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या गंजीला आग लावण्यात आली होती. त्या घटनेतही सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

सलग दोन महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या आग प्रकरणांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. ही केवळ अपघाती घटना आहे की जाणीवपूर्वक लावलेली आग, याबाबत स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती सुरक्षा वाढवावी, रात्र गस्त वाढवावी, तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे आधीच पिकविमा आणि हवामानामुळे नुकसान होत असताना अशा घटनांमुळे आणखी आर्थिक फटका बसत आहे. यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
- अशोक पवळे, स्थानिक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT