

Naigaon Panchayat Samiti government
नायगाव : नायगावचे आमदार राजेश पवार यांनी प्रशासनातील शिस्तभंग, ढिसाळ कारभार आणि नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी पंचायत समितीला अचानक भेट देत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा पंचनामा केला. उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना ‘गांधीगिरी’च्या माध्यमातून हार अर्पण करून प्रशासनाला जबरदस्त धक्का दिला.
यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याही खुर्च्यांना आमदार पवारांनी हार घातला होता. त्यानंतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याचा थेट व्हिडिओ पुरावा असलेल्या कंत्राटी अभियंत्याकडून आमदारांनीच प्रत्यक्ष कबुली घेतली. ही कबुली सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी तातडीची कारवाई करत संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.
कंत्राटी कर्मचाऱ्यावरच एवढी कठोर कारवाई, पण कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काय? त्या दिवशी गैरहजर असलेल्या गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांवर कोणतीही तत्काळ कारवाई झाली नाही, ही बाब जनतेच्या चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार पवारांच्या या धडक आणि निर्भीड कृतीने नायगाव प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे.
नागरिकांच्या नजरा आता जिल्हा प्रशासनाकडे खिळल्या आहेत
लेटलतिफ, गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्धही कारवाई होणार का? आमदार पवारांच्या या ठोस पावलानंतर प्रशासनात एकप्रकारे ‘शिस्तीचा धसका’ निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत अजून कुणावर गंडांतर येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.