सचिन मधुकरराव शिंदे Pudhari
नांदेड

Nanded Youth Death | मांजरममध्ये तरुणाने जीवन संपविले; मृतदेहाजवळील चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख

मांजरम (ता. नायगाव) येथील घटनेने खळबळ, चिठ्ठीतील मजकुराचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

Naigaon Maratha Reservation Note

नायगाव : मांजरम (ता. नायगाव) येथे १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी घडली. सचिन मधुकरराव शिंदे (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सचिन घरातील एका खोलीत गेला. त्याने स्लॅबच्या कडेला दोरी बांधून गळफास घेतला. त्यावेळी घरात सचिन आणि त्याचे आजोबा यशवंत शिंदे हे दोघेच होते. यशवंत शिंदे शेतावरून घरी परतल्यानंतर त्यांना सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

यशवंत शिंदे यांनी तातडीने विळ्याच्या साहाय्याने दोरी कापून सचिनला खाली घेतले. त्यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनला तातडीने मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता सचिनच्या कपड्याच्या उजव्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख नमूद असल्याची नोंद पोलिस पंचनाम्यात करण्यात आली आहे.

चिठ्ठीतील मजकुराचा तपास सुरू

चिठ्ठीत नमूद मजकुराची सत्यता, त्याची पार्श्वभूमी आणि घटनेशी त्याचा संबंध याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांजरम बीटचे पोलिस जमादार शिंदे करीत आहेत.

पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मांजरम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या अकाली निधनाने मांजरम परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT