नांदेड

Nanded Naigaon farmers aid demand |नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या!

Nanded Naigaon farmers demand- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

नायगाव: नांदेड जिल्ह्यासह विशेषतः नायगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष तथा शेतकरी नेते पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन नायगावच्या तहसीलदार गायकवाड मॅडम यांना देण्यात आले.

शरदचंद्र पवार यांनी २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्राचा संदर्भ देत, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला, तरी केवळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीचा उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची शेती व शेतीपूरक व्यवसायाशी संबंधित पात्र कर्जे माफ करावीत. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क आणि मेस फी माफ करावी, शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना सवलतीत धान्य उपलब्ध करून द्यावे, पशुधनासाठी आर्थिक मदत द्यावी आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देऊन तातडीने कार्यवाही करावी,रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध करून द्यावा, जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करावीत, फळबागा व इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि फळबागांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे.

दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने वर्ग करावा. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करून प्रभावी उपाययोजना निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दसरा आणि दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. शासनाने निवेदनातील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या वतीने नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आर. डी. वाघमारे, किसान प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण भवरे, सरचिटणीस किरण वाघमारे, युवा तालुकाध्यक्ष गजानन पवार, सय्यद चांद पाशा, बाळू वडजे, सुरेश शिंदे, गजानन शिंदे, रावसाहेब शिंदे व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT