Naigaon Kharif Crops In Danger
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या मांजरम परिसरात परिस्थिती गंभीर बनली असून सोयाबीनसह कापूस, तूर, ज्वारी आदी पिकांवर संकट ओढवले आहे. शेतात डौलाने उभी असलेली पिके आता माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पेरणीच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च केले. मात्र, पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, सिंचनाची सुविधा नसल्याने अनेक शेतकरी केवळ आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
मांजरम परिसरातील सोयाबीनची अवस्था विशेष चिंताजनक आहे. सकाळी काही प्रमाणात तग धरलेली पिके दुपारच्या कडक उन्हात माना टाकत असल्याचे चित्र आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
मांजरमसह नरसी, कुंटूर, बरबडा आणि नरसी-नायगाव परिसरातील अनेक गावांमध्येही पिकांची अवस्था बिकट होत आहे. विहीर किंवा बोअरची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असला, तरी बहुतांश कोरडवाहू शेतकरी पावसावरच अवलंबून आहेत.
मांजरम येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिगंबर गायकवाड यांनी पाण्याअभावी करपलेल्या पिकांची छायाचित्रे प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ‘एक महिना झाला, पाऊस नाही. पिके जगवायची कशी? आम्ही जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जातो; मात्र आज आमच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे,’ अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
पिकांचे नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून पिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ‘पाऊस पडला तर पीक वाचेल; अन्यथा संपूर्ण वर्षच वाया जाईल,’ अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पाऊस पडून पीक वाचावे, हीच आता देवाकडे प्रार्थना आहे. मात्र पाऊस आणखी लांबला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने तातडीने शेतांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी.— भास्कर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी, मांजरम, ता. नायगाव, जि. नांदेड