housing beneficiaries not receiving funds
नायगाव : नायगाव तालुक्यातील गोरगरिबांना मंजूर झालेल्या घरकुल योजनेचा लाभ केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे मिळत नसल्याने पंचायत समितीत प्रचंड संताप व्यक्त झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी पंचायत समिती गाठून अक्षरशः ‘रुद्रावतार’ धारण करत अधिकारी वर्गाची चांगलीच कानउघडणी केली.
माझ्या तालुक्यातील गरीबांनी व्याजाने पैसे उचलून घरांची कामे सुरू ठेवली आहेत; त्यांची घरे अर्धवट पडली आहेत. आणि तुम्ही ‘डीएससी’चा पोकळ आधार घेऊन त्यांची थट्टा करत आहात? होटाळकर यांनी अधिकाऱ्यांना थेट सवाल केला. त्यांच्या या सडेतोड भूमिकेमुळे प्रशासनाची अक्षरशः भंबेरी उडाली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नायगाव तालुक्यात ५,३४३ घरकुले मंजूर झाली आहेत. जिओ टॅगिंग पूर्ण झाल्यावर १५ हजारांचा पहिला हप्ता तातडीने मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे निधी अद्यापही न मिळाल्याने लाभार्थी संकटात सापडले आहेत. गरीबांनी सावकारांकडून ३ते ५ टक्के दराने व्याजाने पैसे उचलून घरांचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत केले आहे. महागाईचा भार वाढत असताना गरीबांच्या हक्काच्या घरकुल योजनेत न्याय मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
शिवराज पाटील होटाळकर आज सहकाऱ्यांसह गटविकास अधिकारी ढवळे यांच्या दालनात धडकले. अधिकाऱ्यांनी नेहमीचीच भूमिका घेत डीएससी अॅक्टिव्ह नाही. सर्व्हर समस्या आहे, असे कारण पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण तयारीनिशी आलेल्या होटाळकरांनी हा बनाव तिथेच उघडा पाडत जिल्हा प्रकल्प संचालक तुबाकले यांच्याशी थेट फोनवर चर्चा केली. वरिष्ठांनी वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांची बोबडी वळली आणि त्यांचा खोटेपणा समोर आला.
होटाळकरांनी प्रशासनाला थेट इशारा देत स्पष्ट शब्दांत बजावले की, गुरुवारपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला पाहिजे. अन्यथा शुक्रवारपासून तीव्र ‘होटाळकर स्टाईल’ आंदोलन उभारू,
1. प्रलंबित डीएससी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी
2. सर्व ५,३४३ लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता त्वरित वर्ग करावा
3. तालुक्यातील ८० गावांचा गृहयोजनेचा सविस्तर अहवाल गुरुवारपर्यंत सादर करावा
सामान्य माणसाला तुमचे ‘डीएससी, सर्व्हर डाउन’ ही कारणे समजत नाहीत. त्यांना त्यांचे हक्काचे पैसे हवे आहेत. वेळेत निधी दिला नाही, तर आंदोलन करू– शिवराज पाटील होटाळकर, जिल्हाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)