Nagpur Tuljapur Highway Traffic Police
उमरखेड : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड बायपासवर काही ट्रॅफिक पोलीस वाहनधारकांना विनाकारण अडवून त्रास देत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शनिवारी (दि.१४) अचानक बायपासवर धडक भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान चार ते पाच वाहनधारकांना ट्रॅफिक पोलिसांनी अडवून ठेवलेले असल्याचे दिसून आले. यावेळी खासदार आष्टीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत त्यांना सुनावले. शहरात आधीच वाहतुकीची समस्या असताना योग्य नियोजन न करता बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, उपस्थित वाहनधारकांशी संवाद साधताना अनेकांनी ट्रॅफिक पोलिसांकडून विनाकारण वाहन थांबवणे, कागदपत्रांच्या नावाखाली त्रास देणे तसेच धाक दाखवला जात असल्याच्या तक्रारी केल्या. या प्रकाराबाबत खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांना विनाकारण अडवणे किंवा त्रास देणे सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला.
तसेच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत राहून वागावे, तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
जनतेच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देत थेट घटनास्थळी जाऊन प्रशासनाला जाब विचारण्याची खासदार आष्टीकर यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून त्यांच्या या भूमिकेचे वाहनधारकांकडून स्वागत करण्यात येत आहे.