

उमरखेड: नगरपरिषदेच्या २०२५ मधील अटीतटीच्या निवडणुकीत 'उमरखेड जनशक्ती पॅनल'ने बाजी मारली आहे. जनशक्ती पॅनलच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. रविवारी (दि. २१ डिसेंबर) जाहीर झालेल्या या निकालामुळे शहरात जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
या निवडणुकीत तेजश्री जैन यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांना एकूण ११,१०३ मते मिळाली. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपच्या निधी नितीन भूतडा यांना १०,११९ मते मिळाली. तेजश्री जैन यांनी जवळपास ९८४ मतांच्या फरकाने हा विजय संपादन केला. इतर उमेदवार शमीम बी सय्यद युसुफ (AIMIM): ३,६१३ मते, शारदा संजीवकुमार जाधव (शिवसेना): १,३३३ मते, सरोज नंदकिशोर देशमुख (NCP - शरद पवार गट): ७३४ मते तर नोटा (NOTA): १६१ मते मिळाली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण २७,०६३ वैध मते नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, एकही मत अवैध ठरले नाही. प्रशासनाने अत्यंत पारदर्शक आणि शांततेत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत निकाल घोषित केला. निकाल जाहीर होताच उमरखेड शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत समर्थकांनी मोठा उत्सव साजरा केला. या विजयामुळे उमरखेडच्या स्थानिक राजकारणात जनशक्ती पॅनलचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.