Nanded murder case life imprisonment pudhari photo
नांदेड

Nanded Crime: संशयातून तरुणाचा काटा काढणाऱ्या दोघांना जन्मठेप; नांदेडच्या न्यायालयाचा निकाल

निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, पोलिस दलाच्या प्रभावी तपासाचे कौतुक होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः लग्नापूर्वी पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाचा सुतळीने गळा आवळून खून करणाऱ्या दोन आरोपींना नांदेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून, पोलिस दलाच्या प्रभावी तपासाचे कौतुक होत आहे.

8 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादी श्रीरंग पिराजी पवार (रा. इसलापूर, जि. नांदेड) यांचा मुलगा तुषार हा बेपत्ता झाला होता. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली असता, धक्कादायक माहिती समोर आली. तुषार याचे आरोपी दिलीप मिटकर याच्या पत्नीशी लग्नापूर्वी संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच रागातून आरोपींनी तुषारचा काटा काढण्याचा कट करून खून केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली.

आरोपी दिलीप बळीराम मिटकर (वय 21, रा. इसलापूर, ता. किनवट) आणि विजय भोजु जाधव (वय 20, रा. घुंगराळा, ता. नायगाव) यांनी संगनमत करून तुषारचा सुतळीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी कलम 302, 201, 120(ब) व 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल भोसले यांनी केला. त्यांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष न्यायालयात महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. कोकरे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना दोषी धरत जन्मठेप आणि 50,000 रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षाकडून अभियोक्ता रणजित एन. देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ट्रायल मॉनिटरिंग सेलमुळे या खटल्याला गती मिळाली. कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नईम खान आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कोळनुर यांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. या यशाबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकारी व पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT