‘एमआयएम‌’ला विरोधी पक्षनेते पद; काँग्रेसला ठेंगा pudhari photo
नांदेड

Nanded municipal politics : ‘एमआयएम‌’ला विरोधी पक्षनेते पद; काँग्रेसला ठेंगा

निवडीला काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः काँग्रेस वंचित आघाडीच्या दाव्याला ठेंगा दाखवत मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी महापौर कविता मुळे यांनी एमआयएमचे मसूद अहमद खान यांची निवड केली आहे. दरम्यान या निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती काँग्रेसचे अब्दुल गफार यांनी दिली.

निवडणूक पूर्व काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएम या दोघांनीही विरोधी पक्ष नेते पदावर दावे ठोकले होते. महापालिकेत एमआयएमचे 14 तर काँग्रेस आघाडीचे 15 नगरसेवक आहेत. निवडणूकपूर्व आघाडी असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी आम्हीच दावेदार आहोत असे आघाडीच्यावतीने वारंवार सांगण्यात येत होते. या पदासाठी संधी न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही आघाडीच्या नेत्यांनी दिला होता.

दुसरीकडे एमआयएमनेही विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. अखेर महापौर कविता मुळे यांनी एमआयएमचे मसूद अहमद खान यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. विरोधीपक्ष नेतेपद आणि वाद हा महापालिकेत नेहमीचाच चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेस- वंचित बहुजन आघाडीने महापौरांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. परंतु आघाडीच्या मागणीला आणि न्यायालयात जाण्याच्या धमकीला महापौरांनी जुमानले नाही. नांदेड महापालिकेत सोमवारी सकाळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तातडीने विरोधी पक्षनेते पदावर एमआयएमचे मसूद अहमद खान यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीचा एमआयएमकडून जल्लोष करण्यात आले.

कोर्टात जाणार पण...

महापौर कविता मुळे यांच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अब्दुल गफार यांनी स्पष्ट केले असले तरी न्यायालयीन सुनावणीची किचकट व विलंबाने होणारी प्रक्रिया लक्षात घेता या निवडीला तात्काळ स्थगिती मिळेल का? हा प्रश्न आहे.

सपकाळ आले आणि...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी नांदेड दौऱ्यात खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मनपाच्या कारभारावरून सडकून टीकास्त्र सोडले होते. सपकाळ यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मनपात महापौर कविता मुळे यांनी विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीचा तडकाफडकी निर्णय घेऊन सपकाळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT