भाजपचे संभाव्य उमेदवार निश्चित? ‘अंत्योदय‌’मधील ‌‘बार‌’फुसका!  pudhari photo
नांदेड

Nanded Municipal Corporation elections : भाजपचे संभाव्य उमेदवार निश्चित? ‘अंत्योदय‌’मधील ‌‘बार‌’फुसका!

पहिल्या टप्प्यात झालेल्या मुलाखतीनंतरच उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची आता जोरदार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली खरी, परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या मुलाखतीनंतरच उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाल्याने ‌‘अंत्योदय‌’मध्ये झालेल्या मुलाखतींचा ‌‘बार‌’ फुसका ठरतो की काय? अशी चिंता इच्छुकांना वाटत आहे.

प्रगती महिला मंडळात 7 ते 9 डिसेंबरपर्यंत माजी मंत्री डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष अमर राजूरकर आणि भाऊराव चव्हाण कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या पॅनेलमार्फत खा.अशोक चव्हाण यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुमारे साडेतीनशेहून अधिक इच्छुकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.

खा.अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतल्याचे कळताच भावना दुखावलेले खा.अजित गोपछडे यांनीही त्यांच्या कार्यालयामार्फत इच्छुकांचे अर्ज मागवले. 13 आणि 14 डिसेंबर रोजी साडेपाचशेहून अधिक इच्छुकांच्या मुलाखतीही पूर्ण केल्या. या गोंधळात प्रत्येक इच्छुकाला दोन ठिकाणी मुलाखती द्याव्या लागल्या.

खा.गोपछडे यांच्या उठाठेवीनंतरही खा.चव्हाण यांनीच घेतलेल्या मुलाखती व निश्चित केलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम असेल,अशी माहिती आता समोर येत आहे.विशेष म्हणजे झालेल्या मुलाखतींचा अहवालही प्रदेश कार्यालयात आधीच धडकला आहे. तसे झाल्यास अंत्योदयमधील मुलाखती निरर्थक ठरतील, असे मानले जात आहे.

वाढता हस्तक्षेप धोकादायक

नांदेड मनपावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खा.अशोक चव्हाण यांच्याकडेच असावेत, असे पक्षातील जाणकारांचे मत आहे. कंधारमध्ये संघटनात्मक पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या हस्तक्षेपानंतर खा.चव्हाणांची ‌‘मौनम्‌‍ सर्वार्थ साधनम्‌‍‌’ ही भूमिका घेतली होती. आता पक्षहितासाठी मनपा निवडणुकीत चव्हाण कोणाचा हस्तक्षेप खपवून घेतील, असे वाटत नाही. हस्तक्षेपांचा रेटा म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

  • प्रदेश भाजपाने खा.गोपछडे यांना प्रमुखपदाची जबाबदारी दिली असली तरी खा.चव्हाणांच्या तुलनेत त्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा किती अनुभव आहे, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. शहरातील बदलती राजकीय स्थिती, अंदाज बांधण्याची कल्पकता, इच्छुकांची निवडून येण्याची क्षमता, विरोधकांचे आव्हान, शिवाय मतदारांचा कौल, कार्यकर्त्यांची मनःस्थिती याबाबी लक्षात घेता चव्हाणांशिवाय भाजपची ही नौका पार होईल का? हा मोठा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT