नांदेड महापालिकेच्या नूतन महापौर कविता मुळे यांच्यासमोर समस्यांचा डोंगर... Pudhari News Network
नांदेड

नांदेड महापालिकेच्या नूतन महापौर कविता मुळे यांच्यासमोर समस्यांचा डोंगर...

मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी करावी लागणार मोठी कसरत

पुढारी वृत्तसेवा

Nanded Municipal Corporation's new mayor Kavita Mule faces a mountain of problems

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहराचा विकास चहुबाजूंने विस्तार होत आहे. या तुलनेत महापालिकेकडून मिळणा-या मुलभुत सुविधा तोकड्या पडत आहेत. नव्याने महापौर पदाचे सुत्र हाती घेतलेल्या भाजपच्या महिला महापौर कविता मुळे यांच्या समोर शहरातील समस्यांचा मोठा डोंगर उभा आहे. शहरातील मुलभूत सुविधा बरोबरचं विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुळे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

नांदेड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महापालिकेत सत्ता आली. परंतू गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासन राज होतं.

या काळात नागरिकांच्या मुलभूत सुविधांचा मोठ्याप्रमाणावर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून प्रशासनाकडून ही प्रश्न सोडविण्यात फारसे स्वारस्य दाखविले गेले नसल्याने आता या समस्यांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे नुतन महापौर कविता मुळे यांना अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने काम करावे लागणार आहे.

शहरातील वाहतुकीची समस्या

नांदेड शहरातील जुना मोंढा वजिराबाद तरोडा नाका या रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक असते. वारंवार वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. रस्त्याच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण, पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात त्यामुळे ही वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. बसेस, कार, दुचाकी, अॅटो तसेच पादचारी यामुळे दिवसरात्र वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाय शिवाजी पुतळा ते चिखलवाडी कार्नर, बसस्थानक ते देगलूर नाका या रस्त्यावर ही मोठी वाहतुक कोंडी होते. तसेच छत्रपती चौक, तरोडा नाका ते मालेगाव रोड यासह नांदेड शहरातील जुना नांदेड असो किंवा तरोडा नाका, तरोडा बुद्रुक, सिडको, हडको, पावडे नाका अशा अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापौरांना लक्ष घालावे लागणार आहे.

नियमित व शुध्द पाणीपुरवठा

सध्या नांदेड शहराला दोन ते तीन दिवस आड नळाला पाणी येत आहे. पाणी शुध्द नसल्याने मोठ्याप्रमाणावर नागरिकांना फिल्टर पाणी विकत घ्यावे लागते. त्याच बरोबर पाणी अनियमित येत असल्याने तसेच उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे. वेळोवेळी होणारी जलवाहिनीला लागणारी गळती. त्याच बरोबर नांदेडकरांना शुध्द व फिल्टर पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ड्रेनेजची समस्या

शहरातील अनेक भागात ड्रेनेजची समस्या असून, अद्यापही नविन भागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची सुविधा पोहंचली नाही. तसेच ड्रेनेज गळतीच्या समस्या आहेत. रस्ते उंच आणि ड्रेनेजचे टैंक उंच झाली आहेत तर कांही भागात ड्रेनेज खाली व रस्ते उंच झाले त्यामुळे ड्रेनेजला गळती लागली. त्यामुळे अनेक भागात दुर्घधी पसरली आहे. त्यामुळे विशेष निधी मिळवून ड्रेनेजच्या सुविधा पुरवणे व नविन ड्रेनेज लाईन टाकणे आवश्यक आहे.

कचऱ्याची समस्या

नांदेड महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी खाजगी कंत्राटदाराला कंत्राट दिले असले तरी हा कचरा पुर्णतः उचलला जात नसल्याने शहरातील अनेक भागात कच-यांचे ढिग अनेक दिवस साचून राहतात. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. नुतन महापौरांना शहरातील कच-याची विल्हेवाट लावून स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

अंतर्गत रस्ते, नाल्या

नांदेडच्या जुन्या भागात बहुतांश ठिकाणी रस्ते झाले आहेत. मात्र, तरोडा खुर्द व तरोडा बुद्रुक, नमस्कार चौक, गुरुजी चौक, मामा चौक, मालेगाव रस्ता, डिमार्ट भाग, सिडको, हडको या भागात झालेल्या नविन वसाहतींची संख्या अधिक आहे. याठीकाणी अंतर्गत रस्ते न झाल्याने वाहने तर सोडाच पण पायी चालणे देखील कठीण आहे. अशा भागात प्राधान्याने निधीची उपलब्धता करुन रस्ते, नाल्यांची कामे मार्गी लावावी लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT