

Naigaon Ration Scam Syed Rahim Syed Rehman Bail
नायगाव : बंद पडलेल्या रेशन दुकानाचा माल खोट्या माहितीच्या आधारे उचलून घेतल्या प्रकरणाचा आरोप असलेल्या संबंधित प्रकरणात सय्यद रहीम पिता सय्यद मीर व सय्यद रहेमान पिता सय्यद मीर यांना बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु या प्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेऊन सय्यद रहीम यांच्या वतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने काही अटींसह जामिनाचा दिलासा दिला.
न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीची अटक पुर्व जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असे स्पष्ट करताना काही महत्व पूर्ण अटी लावण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये, अशा अटीही घालण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास नायगाव पोलिसांकडून सुरू असून पोलिस निरीक्षक मारकड हे करणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारकड यांचा या प्रकरणात तपास संशय घेण्यासारखा आहे. आरोपींना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध आपण वरिष्ठांकडे धाव घेणार असल्याची माहिती या प्रकरणातील मूळ तक्रारदार गजानन तमलुरे यांनी दिली. या मुळे या तपासाची सूत्रे मारकड यांच्या कडेच राहणार का इतरांकडे जाणार या विषयी चर्चा रंगत दार होत आहे.