नांदेड ः नांदेड महानगर पालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी उमेदवारांची नावे गटनेत्यांनी बंद पाकिटात आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे शुक्रवारी सादर केली.16 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची घोषणा होणार आहे. दरम्यान बंद पाकिटातील नावे त्याच दिवशी उघड होणार असले तरी काँग्रेसच्यावतीने मुन्ना अब्बास, वंचितकडून ॲड. बिलाल अहेमद आणि एमआयएमचे ॲड. मोहम्मद नासेर ही तीन नावे निश्चित झाली आहेत.
स्वीकृत सदस्यांची नांवे सादर करण्यासाठी शुक्रवार दि. 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. भाजप-शिवसेना महायुती, काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएमच्या गटनेत्यांनी दुपारी 3 वाजेपर्यंत आयुक्तांना बंद लिफाफ्यात पक्षाकडून आलेली नावे सादर केली आहेत.
भाजप, काँग्रेस, वंचित आणि एमआयएमकडून अनेक इच्छुकांनी अर्ज सादर केले असले तरी एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के म्हणजे केवळ 8 सदस्यांची निवड होणार असल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. आलेल्या इच्छुकांच्या अर्जातून मर्यादित नावे निश्चित करणे मोठे आव्हान बनले होते. भाजपा आणि काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकुण 8 स्वीकृत सदस्यांपैकी भाजपाला 5 तर काँग्रेस-वंचितला प्रत्येकी 1 आणि एमआयएमच्या वाट्याला 1 नामनिर्देशित सदस्य पाठविता येणार आहे.येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारणसभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समित्यांच्या सदस्य निवडीसोबतच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.भाजपाचे एकुण संख्याबळ लक्षात घेता स्थायी समितीवर या पक्षाचे 10 आणि महिला व बालकल्याण समितीवर 7 सदस्यांना संधी मिळणार आहे.
भाजपची संभाव्य नावे
भारतीय जनता पक्षाचे गटनेते ॲड. महेश कनकदंडे यांनी दुपारी मनपा आयुक्तांकडे पक्षाकडून आलेल्या नावांची यादी बंद पाकिटात सादर केली. स्वीकृतसाठी ॲड.दिलीप ठाकूर, कुणाल कंदकुर्ते, विश्वास कदम, डॉ.शुभांगी देवसरकर,सुषमा थोरात, सुप्रिया संजय पाटील आदी संभाव्य नावांची महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.
मुन्ना अब्बास यांना न्याय
काँग्रेसच्यावतीने अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक राहिलेले मुन्ना अब्बास यांचे नाव आधीपासूनच चर्चेत होते. परंतु पराभूत उमेदवाराला स्वीकृतसाठी संधी न देण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्यामुळे त्यांना पक्षातील एका गटाचा जोरदार विरोध होता.अखेर त्यांचे नाव स्वीकृतसाठी निश्चित झाल्यामुळे मुन्ना अब्बास यांना न्याय मिळाल्याचे मानले जात आहे.
प्रदेश काँग्रेसचा आदेश धुडकावला!
दरम्यान प्रदेश काँग्रेसकडून स्वीकृतसाठी ॲड.सुरेंद्र घोडजकर यांचे नाव आले होते, परंतु काही वेळातच नाट्यमय घडामोडी घडल्या.स्थानिक काँग्रेस नेत्यांनी गटनेत्याला हाताशी धरून मुन्ना अब्बास यांचे नाव ऐनवेळी बंद पाकिटात टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत खा.रवींद्र चव्हाण यांनाही अंधारात ठेवण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.