Nanded Mumbai flight service pudhari photo
नांदेड

Nanded Mumbai flight service : नांदेड-मुंबई विमानसेवा बंद!

शिवसेना (उबाठा) पक्षाने उद्योगमंत्र्यांना जबाबदार ठरवले

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : देशातील प्रमुख शहरे नांदेडहून विमानसेवेद्वारे जोडण्यात आल्याबद्दल भाजपा नेते खा.अशोक चव्हाण आपल्या पक्षाच्या सरकारचे गोडवे गात असताना येथून मुंबईसाठी असलेली विमानसेवा स्टार एअरलाइन्स कंपनीने बंद केल्याची माहिती समोर आली असून शिवसेना (उबाठा) पक्षाने त्यास उद्योगमंत्र्यांना जबाबदार ठरवले आहे.

नांदेड विमानतळावरील हवाई वाहतूक सेवेस १८ वर्षांचा काळ लोटला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून २००८ साली हे विमानतळ सुरू केले गेले; पण तेव्हापासून ‘विमानसेवा कधी सुरू, तर कधी बंद’ असा खेळ सुरू राहिला. काही महिन्यांपूर्वी हे विमानतळ रिलायन्स कंपनीकडून शासनाने ताब्यात घेतले. आता ते महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. त्यानंतर या विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. या विमानसेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता, तरी मागील एक महिन्यापासून ही सेवा अचानक बंद झाली.

नांदेड विमानतळावरून दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळुरु, नागपूर, गोवा आदी मोठ्या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. त्याबद्दल भाजपाचे स्थानिक नेते वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारची तरफदारी करत आले आहेत; पण मुंबईची विमानसेवा बंद झाल्यावर याच नेत्यांनी मौन बाळगले. खा.चव्हाण यांनी रविवारी येथील एका कार्यक्रमात नांदेडसाठी असलेल्या हवाई व रेल्वे सेवेचा मोठा गौरव केला होता; पण त्यानंतरच शिवसेनेचे प्रकाश मारावार यांनी नांदेड-मुंबई विमानसेवा बंद झाल्याची बाब समोर आणली.

यासंदर्भात स्टार एअरलाइन्सच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही. मारावार यांनी विमानतळाशी संबंधित अधिकार्‍यांशी झालेल्या संवादाचे ध्वनिमुद्रण प्रसारमाध्यमांकडे पाठवला आहे. त्यातून वरील विमानसेवा बंद असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला.

ही विमानसेवा सप्टेंबरअखेर पुन्हा सुरू होईल, असे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मधल्या काळात महायुतीच्या जिल्ह्यातील काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन नांदेड-मुंबई विमानसेवा नियमित करण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT