Mukhed Lendi River Project
मुखेड: लेंडी मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुखेड तालुक्यातील हसनाळ (पमु.) येथे लेंडी नदीपात्रात मंगळवारी (दि. १८) जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
लेंडी मध्यम प्रकल्पामुळे हसनाळ व परिसरातील अनेक कुटुंबांचे विस्थापन झाले आहे. पुनर्वसन, आर्थिक मदत, रस्ते, पाणी, घरकुल आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. यापूर्वी शासन व प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार मंगळवारी हसनाळ (पमु.) येथील लेंडी नदीपात्रात प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी अनुप पाटीललेंडी प्रकल्पाचे अधिकारी प्रणव मुदमल यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक येत्या आठ दिवसात घेण्यात येईल, असे लेखी दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रलंबित वाहतूक भत्ता, पुनर्वसन गावासाठी संरक्षण भिंत, पक्का रस्ता, मृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, घरकुल अनुदानाची संपूर्ण रक्कम, घरकुलासाठी रेती, पात्र कुटुंबांना निवासी प्लॉट तसेच प्रत्येक पात्र धरणग्रस्तास पाच लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत आदी मागण्यांचा समावेश आहे.
आता प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या आश्वासनाची पूर्तता होते का आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होतो का, याकडे हसनाळ व परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.