नांदेड

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन

अविनाश सुतार

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आज (दि.२०) साडेनऊच्या सुमारास माहूर नगरीत आगमन झाले. त्यानंतर सकाळी १० वाजता त्यांनी श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन कुलाचार व भोगी पूजा करून महाआरती केली. या विधीचे पौरोहित्य प्रधान आचार्य रविंद्र काण्णव व शंतनु रिट्ठे यांनी केले. Mohan Bhagwat

भागवत यांनी माहूर नगरीत येताच प्रथम त्यांनी मातृतीर्थ तलावाला भेट दिली. श्री रेणुकामाता मंदिराच्या पायथ्यापासून डोलीत बसून त्यांनी मंदिर गाठले. दर्शनानंतर मंदिर कार्यालयात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर व सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी रेणुका मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी कोषाध्यक्ष तथा तहसील किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी, अरविंद देव व आशिष जोशी यांची उपस्थिती होती. Mohan Bhagwat

माहूर नगरीत परतल्यावर भागवत यांनी पुजारी अनिल काण्णव यांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांनी प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर मोजक्याच जिल्हास्तरीय स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. मोहन भागवत मंदिरात असे पर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. दुपारी ४ वाजता माहूर नगरीतील वेदपाठ शाळेला भेट देऊन तेथील बटुंशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माहूरमधून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT