नायगाव : तालुक्यातील मनूर ते इज्जतगाव या महत्त्वाच्या शिवपांदण रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतआहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने अतिक्रमण हटवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मनूर व इज्जतगाव या दोन साखळ्यांना जोडणारा शिवपांदण रस्ता सन २०१७-१८ मध्ये रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आला होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून त्याचे अस्तित्वच धोक्यात आणल्याचा आरोप होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतातील पिके, शेतीची अवजारे तसेच जनावरे ने-आण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा आमदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शिवपांदण रस्ते हे ग्रामीण भागातील शेतीच्या दृष्टीने जीवनवाहिनी मानले जातात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.