नांदेड: गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक येथे संतोष जाधव यांच्या घरासमोर २६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गंभीर दुखापत आणि बेकायदेशीर मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशुतोष दीपक जाधव (वय १९, रा. मनुला बु., ता. हदगाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून आशुतोष याच्याशी वाद घातला. या वादातून आरोपी सोनबाराव जाधव, प्रताप नारायन पवार, गणेश विठ्ठल पवार, सुनील उर्फ सुग्रीव दादाराव जाधव, जीवन सोनबा जाधव, अंकुश किशन पवार, ऋषिकेश मारुती जाधव, विकास सोनबा जाधव, अरविंद अनंता जाधव, ऋषिकेश शिवाजी जाधव, शुभम उर्फ किल्या गजानन पवार, विकास पुंडलीक पवार, श्रीकांत यशवंतराव शिंदे आणि इतर साथीदारांनी आशुतोषला लोखंडी रॉड व काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या पोटावर व अंगावर बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर जखमी आशुतोष जाधव याच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(३), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.