Nanded Mahavitaran Power outages
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : महावितरणचा कारभार सहनशक्तीच्या पलीकडे गेला असून, सततच्या वीज जाण्याने नांदेडकर वैतागले आहेत. ऑनलाईनच्या या काळात अनियमित वीज पुरवठ्यामुळे दैनंदिन कामकाजात विपरीत परिणाम होत आहे. ऊर्जा खाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, या खात्याच्या कारभाराला कंटाळलेले लोक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घडा शिकविण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या नवीन धोरण व सातत्यपूर्ण आवाहनानुसार लोकांमध्ये सौर ऊर्जा वापराबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक घरांवर सोलार पॅनल दिसून येतात. शासनाच्या योजनेच्या लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या शेतात सौर ऊर्जा यंत्रणा बसविलेली आहे. अलिकडेच झालेल्या पावसाने विशेषतः किनवटसारख्या भागात काही ठिकाणी सौर यंत्रणा कोसळून पडल्या. दरम्यान सौर ऊर्जेचा वापर वाढला तरी, महावितरणच्या कारभारात सुसुत्रता व नियमितता येण्याची चिन्हे दिसत नाहीत.
यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून वीज कंपनीने मनमानीचा कहर केला. तांत्रिक अडचणीचे कारण दिले जात असले तरी, यातील सातत्यामुळे लोक आता महावितरणवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. उन्हाळ्यात वीज वापर वाढला तरी, सौर ऊर्जा निर्मितीसुद्धा वाढली असे लोकांचे मत आहे. सोलारच्या माध्यमातून निर्माण होणारी वीज महावितरण विकत घेते आणि संबंधितांच्या वीज वापरानुसार बिल देते. निर्मिती अधिक पण वापर कमी झाला. तर त्या बदल्यात पैसे दिसे जात नाहीत. आणि वीज पुरवठाही सुरळीत होत नाही.
शासन ऑनलाईन कामकाजावर अधिकारी भर देत आहेत. संगणक आणि इंटरनेट हे दैनंदिन कामकाजाचे अविभाज्य भाग झाले असून, सर्वच कामकाज या माध्यमातून होते आहे. आता पावसाळा असला तरी बीज पुरवठा सुरळीत व्हायला तयार नाही. साधारण वेगाने वारे सुटले किंवा रिमझिम पाऊस सुरू झाला तरी वीज गायब होते. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या विद्याशाखांना प्रवेश घेत आहेत. सर्वच महाविद्यालयांचे प्रवेश ऑनलाईन असून, खंडित वीजपुरवठ्यामुळे यात व्यत्यय येतो आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.