नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल अनिश्चितता !  pudhari photo
नांदेड

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल अनिश्चितता!

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड: राज्य विधानसभेच्या निवडणुकीसोबत, नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जाण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनातील निवडणूक यंत्रणेने आवश्यक तयारी केली आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्रिसदस्यीय आयुक्तांनी अलीकडच्या मुंबई दौऱ्यात अद्याप या पोटनिवडणुकीचे संकेत दिले नाहीत. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.

काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे लोकसभेची नांदेडची जागा २६ ऑगस्टपासून रिक्त झाली असून विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूकही होईल, हे गृहित धरून काँग्रेस पक्ष तयारीमध्ये दिसत असताना भाजपाच्या गोटात मात्र अचानक शांतता पसरली आहे.

स्थानिक पातळीवर भाजपामध्ये लोकसभेच्या उमेदवारासंबंधी गेल्या महिन्यात चाचपणी झाली होती, खा. अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वतंत्रपणे बैठका घेऊन लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण असावा, यावरची मते जाणून घेतली. त्यानंतर पक्षाचे माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह काही इच्छुकांनी पक्षनेत्यांच्या भेटींचे एक सत्र पार पाडले, पण प्रदेश भाजपाने लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नदिडमध्ये निरीक्षक किंवा प्रतिनिधी अद्याप पाठविलेला नाही किंवा या विषयावर पक्षाने व्यापक बैठकही घेतलेली नाही.

काँग्रेस पोटनिवडणुकीसाठी पक्षाने दिवंगत खासदारांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांचे नाव गेल्या महिन्यातच निश्चित केले. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास त्याचा लाभ काँग्रेस उमेदवाराला होऊ शकतो, असे गृहित धरून भाजपातील काही लोकप्रतिनिधींनी ही पोटनिवडणूक विधानसभेसोबत होऊ नये अशी मांडणी केली होती. राम पाटील रातोळीकर मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये आहेत. त्यांचा अंदाज मात्र वेगळा म्हणजे पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होईल, असा असल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण सज्जता झालेली आहे. ९ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांचे ठिकाण निश्चित करण्यासह अन्य बाबींची तयारी प्रशासनाकडून झाली आहे. त्याचवेळी लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता गृहित धरून प्रशासनाने आवश्यक तितक्या मतदान यंत्रांची व्यवस्था करून ठेवली आहे. वेगवेगळ्या नमुन्यांतील छापील अर्ज व इतर सामग्रीची जुळवाजुळव करून ठेवण्यात आली असली, तरी अंतिमतः निवडणूक आयोग काय ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे तीनही आयुक्त गेल्या महिन्यात मुंबईमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्यावर त्यांनी मतप्रदर्शन केले नाही, अशी माहिती बाहेर आल्यामुळे विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार का, याबद्दल अनिश्चितता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT