नांदेड : दहशत पसरवत १२ कोटी रूपयांच्या शेतजमिनीचा बनावट कागदपत्रांआधारे ताबा घेण्यासाठी गेलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष मनिंदरसिंघ ऊर्फ मॉन्टीसिंघ जहागिरदार याच्यासह अन्य १७जणांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१०) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पिंपळगाव (महादेव) येथे अतुल मोहनराव पवार यांची गट क्रू.२२०, २२१ व २२२ या परिसरात अंदाजे १२ कोटी रूपये किंमतीची शेतजमीन आहे. या शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी शनिवार (दि.९) रोजी आरोपी रेखा पवार, धीरज पवार, आशिष चारभाई, सागर गोवला रा. मलकागुडा तांडा माहूर, गणेश रूके रा. विशालनगर नांदेड, मनिंदरसिंघ ऊर्फ मॉन्टीसिंघ जहागिरदार रा. नांदेड, विठ्ठल घोडके रा. नांदेड याच्यासह अन्य १० जणं हे घटनास्थळी हातात लाठ्याकाठ्या, दगडगोटे घेऊन आले.
आरोपींनी अतुल पवार व त्यांच्या भावास तुमची जमीन आम्ही गणेश रूके यांच्याकडून सौदाचिठ्ठी करून घेतली आहे व त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी शेतात येऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच रेखा पवार व त्यांच्या अन्य आरोपी साथीदारांनी कट रचून १२ कोटी रूपयांच्या शेतजमिनीचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून आमची फसवणूक केली असल्याची फिर्याद अतुल पवार यांनी दिल्यावरून अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सा.पो.नि. ढेमकेवाड हे करीत आहेत.