Nanded Lightning Alert System pudhari photo
नांदेड

Nanded Lightning Alert System : वीज पडण्यापूर्वी अलर्ट देणारी यंत्रणाच नाही

'दामिनी' आणि 'सचेत' ॲपचाच आधार, ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

संतोष जोशी

नांदेड : ​जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या काळातील वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज पडून मनुष्यहानी व पशुहानी होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे वीज पडण्यापूर्वी तात्काळ स्थानिक पातळीवर अलर्ट देणारी स्वतःची कोणतीही स्वतंत्र किंवा अत्याधुनिक हायटेक यंत्रणा उपलब्ध नाही.

जिल्हा प्रशासनाला 'आयएमडी पुणे' (भारतीय हवामान विभाग) आणि केंद्र व राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडून येणाऱ्या पारंपरिक सूचनांवरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. ​केंद्र सरकारने वीज पडण्याचा पूर्वइशारा देण्यासाठी 'दामिनी' आणि 'सचेत' ही मोबाईल ॲप्स विकसित केली आहेत.

ही ॲप्स वीज पडण्यापूर्वी काही वेळ आधी अचूक अलर्ट देतात. मात्र, ही यंत्रणा वैयक्तिक मोबाईल केंद्रित आहे. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि दुर्गम भागातील नागरिकांना या ॲप्सचा वापर कसा करावा, याची पुरेशी माहिती नसल्याने या तंत्रज्ञानाचा उद्देश अपयशी ठरत आहे. परिणामी, शेतात काम करताना वीज पडून मृत्यू होणाऱ्या निष्पाप नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासाठी वर्ष २००५-२००६ मध्ये एक मोठा प्रयोग करण्यात आला होता. याअंतर्गत मुखेड (तालुका मुख्यालय), हदगाव तालुक्यातील येवली, देगलूर तालुक्यातील मरखेल आणि कंधार तालुक्यातील बाचोटी या चार वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणी 'विज अटकाव यंत्रणा' बसविण्यात आली होती. मात्र, हे यंत्र ज्या उंचीवर बसवले आहे, त्याच्या केवळ सहा पट अंतरावरील (क्षेत्रातील) विजेलाच ते अटकाव करू शकत असल्याचे तांत्रिक पडताळणीत समोर आले.

​"जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः सतर्क राहणे हाच सध्या सर्वात प्रभावी उपाय आहे. हवामान विभागाने 'येलो' किंवा 'रेड' अलर्ट जारी केल्यास, तसेच आकाशात विजा चमकू लागल्यास नागरिकांनी तातडीने सुरक्षित आश्रय घ्यावा. प्रशासकीय यंत्रणा ॲप्सच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहे."
किशोर कुऱ्हे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नांदेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT