

नोएडा : उन्हाळ्याचा तडाखा वाढला की, घरातील झाडे सुकू लागतात. तसेच, उष्णतेमुळे इलेक्ट्रिक उपकरणांना आग लागण्याच्या घटनाही वाढतात. या समस्यांवर उपाय म्हणून नोएडातील मानव रचना इंटरनॅशनल स्कूलच्या आठवीत शिकणार्या आरव मित्तल या विद्यार्थ्याने एक खास यंत्र तयार केले आहे, ज्याचे नाव ‘टेम्पयूम’ (Tempyum) असे आहे. उन्हाळ्यात झाडांना वेळेवर पाणी न मिळाल्यास ती मरतात. आरवने बनवलेल्या या डिव्हाईसमुळे कुंडीतील मातीमधील ओलावा (आर्द्रता) मोजता येणार आहे. झाडाला पाण्याची गरज भासताच हे यंत्र अलर्ट देईल, ज्यामुळे गरजेनुसार पाणी देता येईल. तसेच, घरातील एसी, फ्रीज किंवा फोन यांसारखी उपकरणे जास्त तापमानामुळे गरम होऊन बंद पडतात किंवा काही वेळा त्यांना आग लागते. हे यंत्र घरातील तापमान वाढल्यास लगेच अलार्म वाजवून सतर्क करेल, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल.
आरवने ‘ओरिडिनो नॅनो’ आणि सेन्सरच्या मदतीने गेल्या तीन वर्षांच्या मेहनतीतून हे यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी केवळ 500 रुपये खर्च आला आहे. बाजारात मिळणारी यंत्रे ‘स्टॅटिक’ असतात; पण हे ‘डायनेमिक’ आहे. म्हणजेच युजर आपल्या गरजेनुसार यात बदल किंवा सुधारणा करू शकतो. आरवच्या मते, हे यंत्र लवकरच लहान मुलांमधील पाण्याचे प्रमाण (कूवीरींळेप ढशीीं) तपासण्यासाठी वापरले जाऊ शकेल. उन्हाळ्यात मुलांना होणार्या ‘डिहायड्रेशन’च्या (पाण्याची कमतरता) समस्येवर यातून नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांना वेळेवर पाणी पिण्याची आठवण करून देता येईल. हे डिव्हाईस घराच्या मोकळ्या जागेत लावावे लागते. यात वेळ आणि विशिष्ट तापमान ‘सेट’ करावे लागते. ठरवलेल्या मर्यादेपेक्षा तापमान वाढल्यास हे यंत्र अलार्म वाजवते. महत्त्वाचे म्हणजे, हे यंत्र दररोजचा ‘डाटा रेकॉर्ड’ करते, ज्यामुळे आपल्याला दिवसागणिक होणार्या बदलांचा अभ्यास करता येतो. शाळेच्या ‘मेकर शाला’मध्ये तयार करण्यात आलेल्या या प्रयोगाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.