राजू रेड्डी दांडेलु  Pudhari
नांदेड

Nanded Youth Swept Away | किनवट तालुक्यात पुराच्या पाण्यात तरुण वाहून बेपत्ता; १८ तासांनंतरही शोध सुरू

किनवट तालुक्यातील कंचली–आंदबोरी मार्गावरील पुलावरील घटना; वेगवान प्रवाहामुळे बचावकार्यात अडचणी

पुढारी वृत्तसेवा

Kinwat Flood Incident

किनवट : किनवट तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, कंचली–आंदबोरी मार्गावरील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कंचली येथील राजू रेड्डी दांडेलु (वय ३०) हे बुधवारी (दि. २९) सायंकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर तब्बल १८ तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. गुरुवारी दिवसभर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत असलेले राजू रेड्डी दांडेलु हे कंचलीहून रेवा नाईक तांड्याकडे जात होते. त्यावेळी कंचली–आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत होते. पाण्याच्या प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने त्यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, सरपंच तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाकडून परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, नदीतील पाण्याचा प्रचंड वेग, वाढलेली पाणीपातळी आणि सुरू असलेला पाऊस यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

या घटनेमुळे कंचली परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे पांगरपहाड, आंदबोरी, रेवा नाईक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करून जिवित किंवा वित्तहानीची कोणतीही घटना घडल्यास त्याची तत्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत या घटनेव्यतिरिक्त अन्य कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद प्रशासनाकडे नव्हती.

उंच पूल उभारण्याची नागरिकांची मागणी

अप्पारावपेठ, कंचली आणि आंदबोरी मार्गावरील अनेक पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात वारंवार धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित नाल्यांवर उंच, मजबूत आणि सुरक्षित पूल उभारावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT