Kinwat Teakwood Smuggling
किनवट : चिखली वनोपज तपासणी नाक्यावर अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या तस्करांचा वन विभागाने पाठलाग करून तिघांना अटक केली. कारवाईदरम्यान तस्करांनी वन विभागाच्या शासकीय वाहनाला समोरासमोर धडक देत पसार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वन कर्मचाऱ्यांनी बेंदी तांडा फाट्याजवळ सापळा रचून तिन्ही आरोपींना वाहनांसह ताब्यात घेतले. या कारवाईत दोन सागवान ओंडके, एक टाटा इंडिका कार आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
वन विभागाला चिखली वनोपज तपासणी नाक्यावरून अवैध सागवान लाकडाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी (दि. ६) पहाटे साडेतीनच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यावर सापळा लावला. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणारी एक मोटारसायकल आणि तिच्या मागोमाग येणारी टाटा इंडिका कार दिसून आली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन सागवान ओंडके आढळून आले.
वन कर्मचाऱ्यांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न करताच कारचालकाने भरधाव वेगाने शासकीय वाहनाला समोरासमोर धडक देत किनवटच्या दिशेने पलायन केले. काही वेळानंतर वन कर्मचारी निघून गेल्याचा समज झाल्याने तस्करांनी पुन्हा चिखलीच्या दिशेने मार्ग धरला. याच संधीचा फायदा घेत वन विभागाने बेंदी तांडा फाट्याजवळ पूर्वनियोजित सापळा रचून तिघा आरोपींना रंगेहात पकडले.
या कारवाईत शेख कासिम शेख उस्मान, शेख जावेद शेख रफीक आणि शेख सोहेल शेख शौकत (सर्व रा. चिखली (बु.), ता. किनवट, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एमएच-२६ डीसी-२४२३ क्रमांकाची मोटारसायकल (अंदाजे किंमत ७० हजार रुपये), एमएच-२६ एसी-७२०३ क्रमांकाची टाटा इंडिका कार (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) तसेच ०.१७२ घनमीटर सागवान लाकूड (किंमत ३ हजार ६२९ रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वन गुन्हा क्रमांक ०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, सी. जी. पोतुलवार आणि एन. एन. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. टी. जाधव, मनोज गुरसाळी, वनरक्षक रवी दांडेगावकर, अरुण चुकलवार, मारोती केंद्रे तसेच चालक बाळकृष्ण आवले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.