Crime News Pudhari
नांदेड

Nanded Crime | तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला आरोपी चिखलीतून जेरबंद

चिखली फाट्याजवळ ५० ते ६० महिला-पुरुषांच्या जमावाने तेलंगणा पोलिसांच्या वाहनावर हल्ला करून काचा फोडल्याची घटना

पुढारी वृत्तसेवा

किनवट : तेलंगणा पोलिसांच्या पथकावर हल्ला करून त्यांच्या ताब्यातील आरोपीला पळवून नेल्याच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत किनवट पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शेख बकर ऊर्फ जाफर शेख याला सोमवारी (दि. ३१) सकाळी चिखली येथून ताब्यात घेतले.

रविवारी (दि. ३०) सायंकाळी चिखली फाट्याजवळ ५० ते ६० महिला-पुरुषांच्या जमावाने तेलंगणा पोलिसांच्या वाहनावर हल्ला करून काचा फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील फिर्यादीनुसार, बाजार हतनूर (तेलंगणा) येथील पोलीस उपनिरीक्षक रमेश परशुराम गोकला यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली.

त्यांच्यासोबत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर, छातीवर व डोक्यावर मारहाण करण्यात आली होती. परिस्थितीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोकला यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. मात्र, या गोंधळात तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील शेख बकर ऊर्फ जाफर शेख हा पसार झाला होता. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक गणेश कराड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी प्रल्हाद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली होती. तेव्हापासून पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात होते.

सोमवारी सकाळी आरोपी चिखली गावातच लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी सुमारे अकराच्या सुमारास पोलिस निरीक्षक गणेश कराड व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद जाधव हे पथकासह चिखली येथे पोहोचले. गावात कसून शोध घेत असताना एका घरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाली.

पोलिस निरीक्षक कराड यांनी स्वतः घरात जाऊन पाहणी केली असता आरोपी तेथे आढळून आला. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन किनवट पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, पोलिसांवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT