किनवट, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे , यासाठी किनवट येथे वसतिगृह उभारण्यासाठी 20 कोटी रुपये तर माहूर येथे स्वतंत्र मुलींच्या वसतिगृहासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी किनवट येथे केली. पुढच्या वर्षी मी स्वतः वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करूनच मी धम्म परिषदेला येईन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
समता नगर येथील बुद्धमूर्ती परिसरात आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपाच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम होते. तर मंचावर हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, उमरखेड विधानसभेचे माजी आमदार विजयराव खडसे, बसपाचे मनीष कावळे, जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, बालाजी मुरकुटे, अजय कदम पाटील, सुरज सातूरवार, स्वागत आयनेनीवार यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना बौद्धमूर्ती परिसराला बौद्ध तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मंत्री शिरसाट यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार विजयराव खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात दया भाऊ पाटील यांनी धम्म परिषदेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.
धम्मपरिषदेच्या यशस्वितेसाठी विशाल हलवले, निखिल कावळे, राहुल सर्पे, सुनील भरणे, गोलू आढागळे, संदीप दोराटे, अरुण शेंद्रे, निवेदक कानिंदे, दत्ता कसबे, गौतम धावरे, राहुल चौदंते, सुगत नगराळे, विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले. धम्म परिषदेला मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा राज्यातून हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर ॲड. सुनील येरेकार यांनी आभार मानले.