Kamari short circuit sugarcane fire
हिमायतनगर: तालुक्यातील कामारी येथील शेतकऱ्याचा सहा एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना आज (दि.९) घडली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कामारी येथील शेतकरी जोगेंद्र नरवाडे यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श होऊन अचानक शॉर्टसर्किट होऊन उसाने पेट घेतला. यात शेतातील जवळपास सहा एकरातील ऊस जळून खाक झाला.
अतिवृष्टीने अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस पिके उदध्वस्त झाली असून कामारी परिसरात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. घटनेनंतर माजी आमदार माधवराव पाटील यांनी घटना स्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी केली.