Nanded Ganja Seizure pudhari photo
नांदेड

Nanded Ganja Seizure : लिंबगाव पोलिसांचा छापा; ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सायाळ शिवारात हळदीच्या आंतरपिकात गांजाची लागवड

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : हळदीच्या पिकात आंतरपीक म्हणून अवैधरीत्या गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यावर लिंबगाव पोलिसांनी कारवाई करत ६ लाख ३४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई २६ नोव्हेंबर रोजी सायाळ शिवारात करण्यात आली.

नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'एन-स्टॉप : नशेला स्टॉप, भविष्याला स्टार्ट' या विशेष अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. लिंबगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि पंढरीनाथ बोधनकर व त्यांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना सायाळ शिवारात गांजा लागवडीबाबत गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन राजपत्रित अधिकारी, दोन शासकीय पंच, फॉरेन्सिक सायन्स टीम, वजनमापे तज्ज्ञ आणि फोटोग्राफर यांच्या पथकाने मौजे सायाळ येथील गट क्रमांक २५९ मधील शेतावर छापा टाकला. तेथील हळदीच्या पिकाच्या ओळींमधील सरीमध्ये कापून ठेवलेली व अर्धवट वाळलेली गांजाची झाडे (हिरवी पाने, बिया व काड्यांसह) आढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी शेतात उपस्थित असलेल्या गोविंद किशनराव धुमाळ (वय ६५, रा. सायाळ, ता. जि. नांदेड) यास ताब्यात घेतले. त्याने हे शेत स्वतः कसत असल्याची व गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. पंच व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने १२ किलो ६९५ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ६ लाख ३४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

पोउपनि निजाम मुसा सय्यद यांच्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ब), २० (अ) आणि २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश भंडरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पंढरीनाथ बोधनकर व पथकाने ही कारवाई केली. अंमली पदार्थांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT