Nanded crime news file photo
नांदेड

Nanded crime news: सासरी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; लेकीच्या प्रेमसंबंधाला वैतागून बापाने दोघांनाही संपवलं

नांदेडमध्ये थरारक घटना! विवाहित मुलगी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्यानंतर संतापलेल्या वडिलांनी दोघांचा जीव घेतला.

पुढारी वृत्तसेवा

Nanded crime news

नांदेड : उमरी तालुक्यात गोळेगाव येथे एक विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकरास सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही बाब माहेरच्यांना कळवत तरुणीसह प्रियकरास घेऊन जाण्यास सांगितले. तरुणीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचे सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून प्रियकराचा मृतदेह विहीरीजवळच सापडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मुलीचे आजोबा, वडील आणि काका यांना अटक करण्यात आली. तसेच सासरच्या मंडळीना देखील पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात मुलगा आणि तिचा प्रियकर या दोघांचे शवविच्छेदन सुरू होते. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी कमळे या तरुणीचा गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता. मात्र संजीवनीचे गावातीलच लखन बालाजी भेंडारे या युवकासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम असल्याने याबाबत तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे यास हे संबंध थांबविण्याबाबत वारंवार समजावून सांगितले होते. तरीही तरुणीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे भेटायला गेला होता. ते दोघे गोळेगाव येथील एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तरुणीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहाथ पकडून बांधून ठेवले.

हा सर्व प्रकार तरुणीच्या माहेरी कळविण्यात आला. त्यावेळी तरुणीचे वडील मारुती सुरणे व इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले. सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जा, असे सांगितले. त्यावेळी वडील सुरणे व इतर नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरास गावाकडे नेत असल्याचे सांगून गोळेगावहून निघाले. करकाळा मार्ग ते पायी बोरुजुनीला जात होते. वाटेत झालेल्या प्रकारचा संताप आल्याने वडिलांनी व इतर नातेवाईकांनी संजीवनीचे हात पाय बांधून करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिले. तर मुलाला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह विहीरीजवळ फेकून दिला. हात बांधलेले असल्याने मुलीला विहिरीबाहेर पडता आले नाही. ही बाब काही वेळाने उघडकीस येताच स्थानिकांनी या दोघांचाही शोध घेतला. त्यात रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. तर तरुणाचा मृतदेह सकाळी काही अंतरावर अढळून आला. घटनेनंतर मुलीच्या वडिलांसह काही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरच्या अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील, उमरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले.

संजीवनी दोन महिन्याची गर्भवती...

संजीवनी आणि गोळेगाव येथील सुदेश कमळे यांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता. संजीवनी ही दोन महिन्याची गर्भवती होती असे सांगण्यात आले. तिच्या पोटात असलेल्या बाळाचा व तिचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT