

झानजियांग (चीन) : प्रेमात लोक एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि कोणीही धोका देणार नाही अशी अपेक्षा करतात. मात्र, अनेकदा प्रेमाबद्दलची धक्कादायक प्रकरणे समोर येतात. ती पाहून लोकांना आश्चर्य वाटते. असेच एक प्रकरण सध्या चीनमध्ये समोर आले आहे.
चीनमधील एका 17 वर्षीय मुलीने तिच्या 19 वर्षीय प्रियकराला चक्क विकून टाकले आणि त्याबदल्यात तिला 11 लाख रुपये मिळाले. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील झानजियांग येथे राहणार्या एका 19 वर्षीय तरुणाला त्याच्या 17 वर्षीय गर्लफ्रेंडने धोका दिला. तिने त्याला म्यानमारमधील एका ऑनलाईन स्कॅमर टोळीला विकले. हे संपूर्ण प्रकरण हनीट्रॅपसारखे असल्याचे म्हटले जात आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या नावाखाली मुलीने त्याला फूस लावून नेले आणि सायबर स्कॅमर टोळीच्या हाती दिले.
म्यानमारमधील सायबर क्राईम टोळीकडून तरुणाचा खूप छळ करण्यात आला. त्यामुळे त्याचे वजन अनेक पौंडांनी कमी झाले आणि त्याची ऐकण्याची क्षमताही जवळपास नाहीशी झाली. जेव्हा कुटुंबीयांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्याला वाचवण्यासाठी सरकारकडे मदतीची याचना केली. मोठी खंडणी दिल्यानंतर त्याला देशात परत आणता आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, स्कॅमर त्याला लोकांकडून पैसे उकळण्यास सांगत होते.