नांदेडमध्ये हनीट्रॅप; महिलांच्या टोळीला अटक pudhari photo
नांदेड

Nanded crime : नांदेडमध्ये हनीट्रॅप; महिलांच्या टोळीला अटक

​ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लुटले; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून आणि गोड बोलून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

​शीला सुनील भदरगे (वय ३९, रा. बेलानगर), इंदूबाई विठ्ठलराव वऱ्हाटे (वय ५५, रा. संंतोषनगर), सुनिता रमाकांत सोनकांबळे (वय ५५, रा. सप्तगिरी कॉलनी), रेखा रामचंद्र इंगोले (वय ४५) आणि अमन मारोती कांबळे (वय २२, रा. पालीनगर, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

​शुक्रवारी (ता. ३१ जुलै) एका महिलेने पीडित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला फोन करून "ड्रायव्हरची गरज आहे," असे सांगत बेलानगर येथे बोलावून घेतले. व्यावसायिक तेथे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांना गोड बोलण्यात गुंतवून एका घरात नेले. तेथे जातेच आरोपी महिलांनी व्यावसायिकाला जबरदस्तीने पकडून त्यांचे कपडे काढले आणि मोबाईलमध्ये अश्लील फोटो व व्हिडिओ शूट केले.

​त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाच्या अंगावरील १ लाख २० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. "एक लाख रुपयांची खंडणी दे, नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू," अशी धमकी दिली. व्यावसायिकाने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला आणि थेट भाग्यनगर पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली.

पोलिसांची धाड अन् मुद्देमाल जप्त

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा मारला. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन स्कुटी, चार मोबाईल, एक अॅटो, सोन्याची अंगठी ​असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

​"अनोळखी व्यक्तींकडून नोकरी किंवा व्यावसायिक व्यवहाराच्या नावाखाली एकांतस्थळी बोलावल्यास योग्य ती खातरजमा करावी. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कुणी पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा," असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

​अनेकांना लुटल्याचा संशय

या टोळीने यापूर्वीही अनेक जणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून लुटल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. जप्त केलेल्या मोबाईलच्या तपासातून आणखी काही धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT