नांदेड ः पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने जप्प्त केलेला गुटख्याचा ट्रक. pudhari photo
नांदेड

Illegal Gutkha Seizure : नांदेड-हिंगोलीत 1 कोटीचा गुटखा जप्त

विशेष पथकाची कारवाई, गुटखा माफियांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

नांदेड/ हिंगोली : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पथकाने सोमवारी (दि.19) नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत एकाच दिवशी दोन ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत 73 लाखांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहने असा मोठा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पहिली कारवाई हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हद्दीत करण्यात आली. वारंगा फाटा शिवारात एका कॉम्प्लेक्सजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या वाहनांची (दोन पिकअप व एक टीयूव्ही) झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यामध्ये 14 लाख 67 हजार रुपयांचा गुटखा (राजनिवास, विमल, मुसाफिर, जाफराणी आदी) आणि 10 लाख रुपये किमतीची 3 वाहने असा एकूण 24 लाख 67 हजारांचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणी सदाशिव/करण आवचार आणि प्रभाकर आवचार (दोघे रा. भोसी, ता. कळमनुरी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आखाडा बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने दुसरी मोठी कारवाई सोमवारी दुपारी नांदेड शहरातील इतवारा भागात केली. येथे अवैध गुटखा साठवून ठेवलेल्या गोदामावर छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी सुमारे 73 लाख रुपयांचा गुटखा आणि 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख जिबरान शेख मुखीद आणि गणेश रामराव कऱ्हाळे (रा. नांदेड) या दोघांविरोधात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT