हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद तर चार पंचायत समिती गण व गटाचे आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३) जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले असून कभी खुशी कभी गमचे चित्र राजकीय गटात निर्माण झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद हा गट अनुसूचित जमाती तर पोट बु .(कामारी) हा जिल्हा परिषद हा गट सर्वसाधारण करीता राखीव झाला आहे. याप्रकारे दोन जिल्हा परिषदचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी अनेक दिवसापासून तयारी करणाऱ्या इच्छुकांची संधी हुकली असल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. तर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक होते.हिमायतनगर तालुक्यात सोमवारी पंचायत समितीच्या चार गणासाठी आरक्षण सोडत झाली आहे. यामध्ये कामारी पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर पोट बु. हा गण नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी तर सरसम हा गण अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित झाला आहे. अशा पद्धतीने दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाली.
अनेक इच्छुकांच्या मनाजोगे गटातील आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे कभी खुशी कभी गम पहावयास मिळत आहे. असे असले तरी हिमायतनगर जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर महिला राज येणार, हे निश्चित झाले आहे.