Himayatnagar woman murder Case
हिमायतनगर : मौजे दूधड (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा तपास हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 08 सप्टेंबरच्या रात्री ते 09 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अन्नपुर्णा कोडबाराव शिंदे (वय 50) हिचा राहत्या घरात गळा दाबून खून करण्यात आला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुनिल भारत हातमोडे (वय 30, रा. दूधड, ता. हिमायतनगर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी व मयत महिलेचे अनैतिक संबंध होते. दिनांक 09 सप्टेंबर रोजी महिलेने आरोपीवर गाव सोडून दुसरीकडे जाऊन एकत्र राहाण्याचा दबाव आणल्याने आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले.
हिमायतनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फक्त सहा तासांत उलगडून आरोपीला अटक केली. या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (IPS) यांनी हिमायतनगर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
या तपासात अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके, डैनीअल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत, सपोनि विशाल वाठोरे, पोउपनि अजीमोहीन शेख तसेच पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. सदर खुनाचा पुढील तपास सुरू आहे.