सुभाषराव जल्लवाड Pudhari
नांदेड

Nanded Farmer Death | उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मंगरूळ गावावर शोककळा; शेतातील तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Himayatnagar Former Sarpanch Electrocution Death

हिमायतनगर : तालुक्यातील मंगरूळ येथील माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रगतिशील शेतकरी सुभाषराव सखाराम जल्लवाड (वय ६१) यांचा शेतात ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मंगरूळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जल्लवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुभाषराव जल्लवाड हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या शेतात ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांनी शेताच्या बांधावर दुचाकी उभी केली आणि कपडे बदलल्यानंतर ऊसाच्या शेताकडे गेले. यावेळी ऊसाच्या फडात तुटून पडलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला. यात त्यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि पोलीस कर्मचारी श्याम नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.

सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने गावात हळहळ

सुभाषराव जल्लवाड हे मंगरूळ गावचे माजी सरपंच, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने गावाने एक अनुभवी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) मंगरूळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार जवळगावकरांकडून कुटुंबीयांचे सांत्वन

माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जल्लवाड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि सुभाषराव जल्लवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली. जल्लवाड हे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांनी गावासह समाजाच्या सेवेसाठी योगदान दिले. त्यांचे अकाली निधन दुःखद असल्याची भावना जवळगावकर यांनी व्यक्त केली.

यावेळी गजानन सूर्यवंशी, परमेश्वर गोपतवाड, गोविंद बंडेवार, संतोष आंबेकर, अवधूत पाटील, नितेश जैस्वाल, प्रवीण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT