Himayatnagar Mahavitran NCP Protest
हिमायतनगर : हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरण विभागाचा मनमानी, अरेरावी व एकाधिकारशाही कारभार उघडकीस आला असून शेतकरी आणि सामान्य वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात तसेच काही ठिकाणी गावांमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतरीत्या डीपी बसविण्यात येत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकारांच्या निषेधार्थ आणि दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वामन पाटील मिराशे यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.
नुकतेच तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदकाम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर डीपी बसविल्याचा प्रकार घडला. याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी “तुम्हाला काहीही करता येणार नाही, आम्ही आमच्या अधिकारात आहोत,” अशा उद्धट भाषेचा वापर केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. नियम, प्रक्रिया व परवानगीविषयी माहिती मागितल्यावर उलट धमकावण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
याशिवाय हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील अनेक वीजग्राहकांना चुकीच्या मीटर रीडिंगद्वारे अवाजवी व वाढीव वीजबिले देऊन मानसिक त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महावितरण नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामन मिराशे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने सखोल चौकशी करून दोषी अभियंते, लाईनमन व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फी करावी, तसेच वीजग्राहकांना पारदर्शक व नियमबद्ध सेवा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यास शासनाचे होणारे नुकसान आणि जनतेची लूट थांबविण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.