Himayatnagar Taluka School Gate Protest
हिमायतनगर: शासकीय नियमांनुसार शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही, जिल्ह्यावरून रोज 'अपडाऊन' करत वेळेत न येणाऱ्या शिक्षकांना कामारी (ता. हिमायतनगर) येथील संतप्त पालकांनी चांगलाच धडा शिकवला. मंगळवारी (दि.१४) सकाळी उशिरा आलेल्या शिक्षकांना पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच (गेटवर) अडवून जाब विचारला.
तब्बल काही तास शिक्षकांना गेटबाहेर उभे ठेवत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि तात्काळ केंद्रप्रमुखांना घटनास्थळी पाचारण करण्यास भाग पाडले. चालू शैक्षणिक सत्रात अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मंगळवारी सकाळी ७ वाजता शाळा भरणे अपेक्षित असतानाही अनेक शिक्षक वेळेवर उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, विद्यार्थी सकाळी ९ वाजेपर्यंत शाळेच्या गेटबाहेर शिक्षकांची वाट पाहत उभे होते. हा प्रकार पाहून पालकांचा संयम सुटला आणि त्यांनी उशिरा आलेल्या शिक्षकांना प्रवेशद्वारावरच रोखले.
पालकांनी शिक्षकांसमोर आपली तीव्र नाराजी व्यक्त करताना संबंधित शिक्षक शासनाचे कडक निर्देश धुडकावून मुख्यालयी राहत नाहीत. ते जिल्ह्यावरून रोज प्रवास (अपडाऊन) करत असल्याने कधीही वेळेवर पोहोचत नाहीत. शिक्षकांच्या लेट-लतीफ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही शिक्षकांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. कामात कुचराई करत केवळ वेळेत पळ काढण्यासाठीच शिक्षक शाळेत येतात, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
तालुक्यात नव्याने गटशिक्षणाधिकारी रुजू झाले असले, तरी जिल्हा परिषद शाळांच्या कारभारात कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक केंद्रप्रमुख शाळांना नियमित भेटी देत नसल्याने शिक्षकांच्या उपस्थितीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
या संपूर्ण प्रकारानंतर कामारीच्या ग्रामस्थांनी आणि पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन दोषी शिक्षकांवर तात्काळ कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच केवळ कामारीच नव्हे, तर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये अचानक तपासणी मोहीम (सरप्राईज व्हिजिट) राबवून शिक्षकांच्या उपस्थितीची नियमित खातरजमा करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.