Pudhari
नांदेड

Nanded Hunger Strike | 'जागा मिळेपर्यंत माघार नाही'; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरु

हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आता चौथ्या दिवशीही कायम

पुढारी वृत्तसेवा

Himayatnagar hunger strike

हिमायतनगर : हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आता चौथ्या दिवशीही कायम आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. उपोषणकर्ते माधव शिंदे यांनी “जागा मिळेपर्यंत माघार घेणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनस्थळी उपस्थित समर्थकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही, तर सर्व समाजाला सोबत घेऊन गावबंद आंदोलन छेडले जाईल.

नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही पर्यायी जागांपैकी एकही जागा देणे शक्य नसल्याचे लेखी कळवल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे उपोषणकर्त्यांची अवहेलना झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, “जागा मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील” अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली. तसेच उपलब्ध जागांमधून पर्याय सुचवावा, त्यापैकी एक जागा निश्चित करण्यास तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव वाढत आहे. पुतळ्यासाठी जागा न मिळाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हिमायतनगरमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यापासून अनेक मोक्याच्या सार्वजनिक जागांवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर येत आहे. काही ठिकाणी तर थेट ताबा घेऊन बांधकाम व व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुतळ्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शहरातील अतिक्रमण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT